नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून जगभर झाला याचा पुरावा अनेक संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून उघड झाला आहे. त्यामुळे चीनची पोलखोल झाली आहे. वुहानमधूनच कोरोनाने जगभर हातपाय पसरल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
चिनी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार, वुहानमधील जवळपास ५ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. म्हणजेच, सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तब्बल दहा पट हा आकडा आहे. या अभ्यासामध्ये ३४ हजार लोकांचा समावेश होता. वास्तविक, कोरोना संक्रमणाच्या दराचा अंदाज घेण्यासाठी हा अभ्यास केला गेला, ज्यात वुहान व्यतिरिक्त शांघाय, बीजिंग, हुबेई, गुआंग्डोंग, जिआंग्सू, सिंचुआन आणि लियाओनिंग प्रांतातील लोकांचा समावेश होता. लोकांच्या रक्ताचे नमुने तपासले गेले आणि त्यात अँटीबॉडीज सापडले.
वास्तविक, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँन्टीबॉडीज होण्याचा अर्थ असा आहे की, त्या व्यक्तीस एखाद्या वेळी विषाणूची लागण झाली आहे आणि त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिपिंडे (प्रतिकारक जीवाणू ) बनवले आहेत. वुहानची लोकसंख्या ११ कोटी आहे. एका अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळले की, इथल्या ४.४ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरूद्ध विशिष्ट प्रतिपिंडे आढळली आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की, वुहान बाहेर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण बरेच कमी आहे. हुबेई प्रांतातील इतर शहरांमध्ये सर्वेक्षण केलेल्या केवळ ०.४४ टक्के लोकांमध्ये कोरोनासाठी प्रतिपिंडे आढळली. त्याचवेळी, या प्रांताबाहेर सर्वेक्षण केलेल्या १२ हजारहून अधिक लोकांपैकी केवळ दोन लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत.
वुहानमध्ये अजूनही कोरोनाचा विषाणू असून तेथे सातत्याने बाधित होणारे आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना चीनमधून प्रसारित झाला नसल्याचा चीनचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट होत आहे.