मुंबई – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच विविध प्रकारचे आंदोलनही केले जात होते. याचनिमित्ताने महाविकास आघाडी सरकारला खिंडीत गाठण्याचे काम भाजपकडून सुरू होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर अखेर राठोड यांनी राजीनामा दिला आहे.
पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येला राठोड हे जबाबदार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. किंबहुना तसे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. अखेर राठोड यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप सुरू झाल्यानंतर राठोड अचानक अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते सर्वांसमोर आले. त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन याप्रकरणी प्रथमच भाष्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच याप्रकरणाची चौकशी जाहिर केली आहे. ही चौकशी सध्या सुरू आहे. आज सकाळीच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राठोड यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते.