नवी दिल्ली – रेल्वे मंत्रालयाने ४८ तासानंतर सर्वसाधारण तिकीट देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. प्रवासी आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आता सर्वसाधारण तिकीटांवर प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत. त्यामुळे आरक्षित तिकीटच बंधनकारक असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व विभागीय रेल्वे मंडळाला नव्या आदेशाची माहिती दिली असून यात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालय अद्याप एक्स्प्रेस, सामान्य सुपरफास्ट गाड्या चालवण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोना काळात केवळ विशेष गाड्या रुळावर दिसतील, ज्यामध्ये शारीरिक अंतराचे नियम राखले जातील आणि प्रतीक्षा तिकिटे लागू होणार नाहीत, असा निर्णय करण्यात आला आहे.
दरम्यान, नऊ महिन्यांनंतर रेल्वेने दि. ८ डिसेंबरला पुन्हा एकदा सर्वसाधारण तिकिटांवर प्रवास सुरु असलेल्या विशेष गाड्यामधून प्रवास करण्याचे फर्मान जारी केले. तसेच रेल्वे मंडळाने सर्व झोनला याबाबत निर्देश जारी केले आणि सर्वसाधारण तिकिट रेल्वे स्थानकांवर विक्री करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अशी अपेक्षा केली जात होती की, विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वे सध्या प्रवासी गाड्या व सध्या धावणाऱ्या विशेष गाड्यांना सामान्य डबे बसवले जातील. त्याचा सर्वाधिक फायदा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना झाला. या व्यतिरिक्त सामान्य सार्वजनिक तिकिट बुकिंग सेवा (जेटीबीएस) सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली. मात्र पुढील आदेश येईपर्यंत रेल्वे मंत्रालयाने तिकिट विक्रीवर बंदी घातली आहे. जनता कर्फ्यू म्हणजेच २२ मार्चपासून सर्वसाधारण तिकिट विकले जात नव्हते. लॉकडाउन होण्यापूर्वी ऑटोमॅटिक तिकिट व्हेंडिंग (एटीव्हीएम) कडून स्मार्ट कार्डद्वारे तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांनाही फटका बसला. मात्र, नंतर रेल्वे मंत्रालयाने अशा प्रवाशांना दिलासा मिळाला होता.