मुंबई – राज्याचे नवे मुख्य सचिव ठरले आहेत. या पदावर नक्की कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी आणि सीताराम कुंटे यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. अखेर महाविकास आघाडीने सीताराम कुंटे यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. सध्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे उद्या (२८ फेब्रुवारी) निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार याची चर्चा मंत्रालयासह संपूर्ण राज्यात होती. अखेर कुंटे यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
कुंटे आणि परदेशी हे दोन्ही १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. दोन्हीही कार्यक्षम असल्याने नक्की कुणाला संधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. परदेशी हे संयुक्त राष्ट्राची सेवा बजावून गेल्या ३० डिसेंबरलाच परतले आहेत. त्यांनाही राज्य सेवेत येण्याची उत्सुकता होती. मात्र, परदेशी यांना संधी मिळालेली नाही. कुंटे हे उद्या रविवारीच पदभार स्विकारणार आहेत.