मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागास वर्गीयांसाठीच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे, त्यानुसारच आपण सत्तेत असताना कायदेशीर तरतुद केली होती, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. भाजपाने ओबीसी समाजासाठी वेगळं महामंडळ तयार केलं त्यासाठी ५०० कोटीचं अनुदानही दिलं.
या महामंडळात आता २०० कोटी आहेत, पण सरकार हा निधी वितरित करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारमधले मंत्री ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असले, तरी भाजपा ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते.