मुंबई – राज्यातील पोलिस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मोठी घोषणा केली. पोलिस भरतीचा अध्यादेश रद्द करण्यात आला असून यासंदर्भात सरकार नवीन अध्यादेश काढणार आहे. तशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
पोलिस भरतीबाबत ४ जानेवारी रोजी सरकारने अध्यादेश काढला होता. त्यात एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवा अध्यादेश काढणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
४ जानेवारीच्या अध्यादेशानुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून भरतीत समाविष्ट लागणार होते. यासंदर्भात जोरदार विरोध करण्यात आला. सरकारकडे अनेक तक्रारी आल्या. त्याची दखल घेत देशमुख यांनी हा अध्यादेश रद्द करुन नवा आदेश काढण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.