नवी दिल्ली – मोबाईल आणि संगणकामधील पब्जी गेमने लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. आतापर्यंत पब्जी सुमारे 600 कोटी वेळा डाउनलोड केले गेले असून जागतिक स्तरावर 50 कोटी सक्रिय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे भारतात 33 कोटी वापरकर्ते असून मुलांना अक्षरशः वेड लावणाऱ्या या गेम वर बंदी आणावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे भारतात गेल्या वर्षी त्यावर बंदी घातली गेली, त्यानंतर देखील हा गेम सुरूच होता, मात्र आता जगभरात पब्जी गेम बंद केला जाणार आहे.
बॅटल रॉयल गेम (पीयूबीजी ) मोबाइल लाइट कंपनीने जाहीर केले आहे की, दि. 29 एप्रिल पासून पब्जी अधिकृतपणे जागतिक स्तरावर बंद केले जाईल. तथापि, कोणत्या कारणास्तव हा खेळ थांबविला गेला आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. वर्ष 2019 मध्ये एंट्री लेव्हल डिव्हाइससाठी पीयूबीजी मोबाइल लाइट ( पब्जी ) बाजारात आणले गेले.
गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी भारत सरकारने पब्जीवर बंदी घातली होती. तथापि, आता पीयूबीजी मोबाइल क्राफ्टनच्या संचालकांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक संदेश पाठवून माहिती दिली की, पीयूबीजी मोबाइल लाइटची ( पब्जी ) आवृत्ती बंद करण्यात येईल.
वास्तविक पब्जीला जगभरातून भरपूर पाठिंबा मिळाला असून त्याचे मोठ्या संख्येने चहाते होते. कोरोना विषाणूच्या कठीण काळात, पब्जी मोबाइल गेमने लोकांचे मनोरंजन करण्याचे कार्य केले आहे. कोरोनाच्या काळात त्याची लाइट आवृत्ती जोरदार लोकप्रिय झाली.
तथापि, भारतीय अखंडता आणि सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत हा मोबाइल लाइट गेम बंद केला होता. तसेच त्यानंतर पीयूबीजी कॉर्पोरेशनने टेंन्सेट कंपनीबरोबरची भागीदारी तोडण्याची घोषणा केली, आणि भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.