पिंपळनेर, ता. साक्री
येथील ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीवरुन निवृत्त ग्रामविकास अधिकारी एस बी देसले यांनी त्यांचे आत्मदहन आंदोलन मागे घेतले आहे. गट विकास अधिकारी जी टी सूर्यवंशी यांच्या मध्यस्थीने हे आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. ४५ दिवसाच्या आत फेरचौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आश्वासन देसले यांना देण्यात आले आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी याची खातेनिहाय चौकशी सुरु असल्याची माहितीही ग्रामविकास अधिकारी डी डी चौरे यांनी दिली आहे.
देसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर ग्रामपंचायतीने सन 2011-12 मध्ये बंदिस्त गटारीचे काम केले होते. ते काम एस बी दिसले यांचे कार्यकाळात पूर्ण झाले. नंतरही या कामावर ५ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देसले यांनी सन 2013 मध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी साक्री चंद्रकांत भावसार यांच्याकडे केली होती. चौकशी अधिकारी म्हणून तत्कालिन ए पी महाले यांची नियुक्ती केली. या चौकशीत त्यांनी अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देसले यांनी केला. म्हणूनच 2 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय देसले यांनी घेतला. त्याची दखल घेत गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी देसले यांची भेट घेतली. याप्रकरणी फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यानंतर देसले यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.