देवळा : बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणारे तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अखेर निलंबित केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले आहेत.
८ फेब्रुवारीला एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते. त्यानंतर देवळा दुय्यम निबंधक कार्यलयाची त्रिसदस्यीय पथकाद्वारे चौकशी करण्यात आली तसेच तपासकामात अडथळा येऊ नये म्हणून ९ फेब्रुवारीलाच दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेण्यात आला होता. चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली होती. आता अखेर बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणे दुय्यम निबंधकाना चांगलेच भोवले असून बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणारे तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले आहेत.