नाशिक – नाशिक शहराला भगूरसह ग्रामीण भागाशी जोडणारा रेस्ट कॅम्प रोडवरील नागझिरा नाल्यात डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून हा रस्ता देवळाली शहरातील भूमिगत गटार योजनेच्या पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत या नाल्यावरील रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले होते. यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघाताची मालिका सुरू होती.
येथून वाहने ने-आण करतांना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके याच्यासह अन्य राजकीय व पंचक्रोशीतील नागरिकांनी येथील प्रशासन व लोकप्रतिनिधीना वारंवार निवेदनही सादर केले होते. मात्र आर्थिक कात्रीत सापडलेले प्रशासन या रस्त्यावर डांबरीकरण करण्यास असमर्थता दर्शवित होते.मात्र रस्त्यावर होणारे अपघाताची संख्या पाहता येथील उपाध्यक्ष सचिन ठाकरे व नगरसेवक भगवान कटारिया यांनी प्रशासनाकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करत येथील समस्या मार्गी लावण्याबाबत सुचविले होते. याशिवाय बोर्डाच्या बैठकीत देखील हा प्रश्न लावून धरला होता.शुक्रवारी सांयकाळी उशिरा या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले यामुळे पंचक्रोशीतून समाधान व्यक्त केले जात आहे.