नाशिक – दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीत असलेल्या हायमीडिया या औषध कंपनीच्या प्रशासनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका कंपनीच्या व्यवस्थावर ठेवण्यात आला असून, दिंडोरी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हायमीडिया कंपनीत दि. २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याची दखल घेत कंपनी बंद ठेवण्याची सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. मात्र, कंपनी बंद ठेवण्यात आली नाही. अखेर तेथील ४४ कामगार बाधित झाले. सरकारच्या नियम व आदेशांचे पालन न करता हलगर्जीपणा करत संक्रमण वाढण्यास जबाबदार धरत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र रसाळ, प्रवीण भोळे यांच्यासह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंध, कोविड- १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड आदी करीत आहेत.
एव्हरेस्टवरही कारवाई होणार
लखमापूर फाटा येथील एव्हरेस्ट कंपनीतील ४७ कामगार कोरोनाबाधित झाले आहेत. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कंपनीत पत्रे वाहतूक करताना वाहनचालकांची योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे काेरोना संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. एव्हरेस्ट कंपनी व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.