दिंडोरी – पिंप्रज प्राथमिक शाळेचे महेंद्र जाधव या शिक्षकास अखेर निलंबीत करण्यात आले आहे. पंचायत समिती कार्यालयातील कारकुनास भ्रमणध्वनीवरुन शिवीगाळ तसेच दमबाजी करुन मारहाण करण्याची धमकी या शिक्षकाने दिली होती. अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जाधव याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्रज, ता. दिंडोरी येथील महेंद्र जाधव ह्या प्राथमिक शिक्षकाने दिंडोरी पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक भास्कर झिरवाळ यांना ता. २५ ऑगस्ट रोजी सायकांळी ७.५७ वाजता फोन केला. यावेळी त्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच दमबाजी करुन मारहाण करण्याची धमकी दिली. सदर संभाषणाची १.३३ मिनीटांची ध्वनीफीत केंद्र कोचरगांव या व्हाटस अॅप गुपवर त्याच दिवशी रात्री शेअर केली. झालेल्या या प्रकाराबाबत पंचायत समिती कर्मचारी व शिक्षक समन्वय समिती (सर्व शिक्षक संघटना) यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच या प्रकाराचा निषेध नोंदवला. संबधित शिक्षकाची चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये याप्रकारणाची चौकशी करुन सविस्तर अहवाल जिल्हा परीषदेकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी झालेल्या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली. त्यामुळेच महेंद्र जाधव यांनी प्राथमिक शिक्षक पदाच्या कर्तव्यात अक्षम्य कसुरी केल्याबद्दल तसेच केलेले वर्तन हे शिक्षकी पेक्षास अशोभनीय असल्याचे नमूद करुन जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.