दिंडोरी – आंघोळीचे तापलेल्या पाण्याने भाजून जखमी झालेल्या ‘त्या’ दुर्दैवी अल्पवयीन विवाहितेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुलीच्या आई व सासरच्यांनी उपचारात हलगर्जी केल्याने अल्पवयीन विवाहितेचा मृत्यू झाल्याची फिर्याद वणी पोलिसांत देण्यात आली आहे. त्यामुळे पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लॉकडाऊन काळात विवाहास शासनाची परवानगी नसतांनाही २ मे २०२० रोजी मुलगी रेणुका (वय १३ वर्ष ३ महिने) हिचा बालविवाह किरण संजय बिडवे (रा. खंबाळेवाडी ता. इगतपुरी) याच्याशी करंजवण (ता. दिंडोरी) येथे करण्यात आला. माहेरकडील नातलगाच्या दशक्रिया विधी साठी विवाहिता करंजवण येथे २४ नोव्हेंबर रोजी आली. त्याचवेळी पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने ती भाजली. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत पती किरण व नणंद प्रतिक्षा हे सुद्धा भाजले. या सर्वांवप त्यांच्यावर उपचार सुरू असतांना पोलिसांनी तसेच बाल कल्याण समिती नाशिक यांनी अल्पवयीन विवाहितेचे जाब जबाब घेतले. त्यात बालविवाह झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी २२ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगिता संजय बिडवे, रा. खंबाळेवाडी, ता. इगतपूरी, ज्योती पितांबर जाधव, रा. लखमापूर, ता. दिंडोरी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सुमारे पन्नास टक्के भाजलेल्या रेणुका उर्फ गायत्री हिच्यावर वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार करण्यात येत होते. मात्र २७ जानेवारी रोजी घोटी येथे उपचारा दरम्यान रेणूका उर्फ गायत्रीचा मृत्यू झाला. मुलगी गंभीर भाजली असतानाही तिच्यावर औषधोपचार करणे गरजेचे असतांनाही हयगय आणि अविचाराने निष्काळजीपणा केला. तिला घरीच ठेवल्याने तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याची तक्रार मयत मुलीची आई ज्योतीबाई पिंताबर जाधव (वय ४९, रा. लखमापूर) हिने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.