नवी दिल्ली – कोरोनाचा प्रसार जसजसा वेगाने होत होता, तसा मास्क आणि सोशल डिस्टनसिंगबाबत जागृती करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले. मोबाइलची कॉलर ट्यून हा त्याचाच एक भाग. यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मदत घेण्यात आली. आणि त्यांच्या आवाजातील ही ट्यून गेले अनेक महिने आपण ऐकत आहोत. आता कोरोनावर लस आल्याने ही ट्यून बंद करण्यात येणार असून त्याजागी जसलीन भल्ला हिच्या आवाजातील लसीकरणासंबंधी माहिती देणारी ट्यून येणार आहे.
ही नवी ट्यून हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये असेल. याआधीही जसलीन भल्ला हिच्या आवाजातील कॉलर ट्यून आपण गेल्यावर्षी मार्च – एप्रिलमध्ये ऐकली आहे. ‘हमे बीमरीसे लडना है, बीमारसे नहीं’, अशी कॉलरट्यून आपल्याला या काळात ऐकू येत होती, ती जसलीनच्याच आवाजातील होती.
कोरोनाबद्दल पुरेशी जागृती झाल्यानंतर आणि आता कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने सरकार या लसीबद्दल जागृती करणार आहे. यासाठी ही नवीन कॉलरट्यून आणण्यात आली आहे. दोन्ही भाषांमध्ये असलेल्या या ट्यूनमधील मेसेज ३० सेकंदांचा आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या कॉलर ट्यूनमध्ये कोरोना वॉरियरचा आवाज असावा, असा मुद्दा यात मांडला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही ट्यून बदलण्यात यावी, असेही यात म्हटले होते.
कोण आहे जसलीन भल्ला
जसलीन ही एक प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. जवळपास १० वर्षांपासून ती या क्षेत्रात आहे. दिल्ली मेट्रो, स्पाईस जेट तसेच इंडिगोच्या फ्लाईटमध्ये आपल्याला तिचा आवाज ऐकायला मिळतो.