बीजिंग – पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या नऊ महिन्यांपासून भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थिती संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण दोन्ही देशांनी एलएसीवरील पांगोंग लेक परिसराच्या पुढच्या ओळीवरुन आपले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अखेर चीन नरमला, असे म्हटले जात आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांमधील सहमतीनुसार सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताने अद्याप याची अधिकृतपणे खात्री झाली नाही. तथापि, परिस्थिती सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सध्या अधिवेशन सुरू असल्याने सरकार बहुधा बाहेर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करणे टाळत आहे. परंतु संरक्षणमंत्री राजनाथ सिंह स्वत: सभागृहाला याबाबत लवकरच सभागृहात माहिती देतील, असा विश्वास आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता वू झियान यांनी एक संक्षिप्त निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार भारत आणि चीनच्या सैन्य कमांडर स्तराच्या ९ व्या फेरी दरम्यान झालेल्या कराराच्या आधारे, पांगोंग हनान आणि उत्तर पूर्व म्हणजे भारतातील पूर्व लद्दाखलगतच्या एलएसी भागातील सैनिकांची माघार सुरू झाली आहे. एलएसीवर चीनच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमधील सीमेवरील परिस्थितीशिवाय अन्य कोणत्याही विषयावर बैठक झाली नाही. याबाबत भारताने अधिकृतपणे भाष्य केलेले नाही, परंतु परिस्थिती सकारात्मक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांने सांगितले आहे.