नाशिक – गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली कांद्याची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला असून जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले आहेत. केंद्र सरकारच्या जाचक नियम आणि कारवाई यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. कांद्याचे दर वाढल्यानंतर अचानक बाजार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचीही मोठी कोंडी झाली होती. अखेर शुक्रवारी लिलाव सुरू झाले आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत ५०० क्विंटल कांद्याची आवक झाल्याचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे. तर, उन्हाळ कांद्याला किमान १५०० रुपये, सरासरी ५ हजार १०० तर सर्वाधिक ५ हजार ९०० एवढा दर मिळाला आहे.
दरम्यान, चांदवड, नामपूर, उमराणे, सटाणा, देवळा या पाच बाजार समित्यांमध्ये ईद ए मिलाद निमित्त बाजार समितील व्यवहार बंद आहेत. तर, उर्वरीत बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत.