मुंबई – जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकारण ढवळून निघाले होते. अखेर त्यांनी नवरात्रीचा मुहूर्त साधत हा प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात त्यांच्या बरोबर त्यांची कन्या व जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे आणि ६८ जणांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पेटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अरुण गुजराथी यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यात त्यांनी सांगितले की, एकनाथराव खडसे हे कधीपासूनच राष्ट्रवादी येण्यासाठी चालले होते. पण याआधीही जमले नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या सर्व घटना घडत गेल्या आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष वाढवला. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. आमचा राजकीय विरोध असला तरी मनात कधीही कटुता नव्हती खडसे यांच्या आगमनाने जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी मजबूत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल – शरद पवार
नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल यात माझ्या मनात शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरुन नाथाभाऊ मागे हटत नाहीत असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यावेळी सांगितले. नाथाभाऊ पक्षात आल्याने आता पक्षाला गती येईल, नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपण जळगावला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
आज त्यांना कळेल टायगर अभी जिंदा है : जयंत पाटील
एकनाथराव खडसे यांना कट कारस्थान करून बाजूला सारण्यात आले असले तरी त्यांनी दाखवून दिले की ‘टायगर अभी जिंदा है’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षप्रवेश कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळली.
या कार्यक्रमात पाटील यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी ते म्हणाले की आपण विधानसभेत प्रश्न विचारला होता की कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही. अर्थात उत्तर मिळाले नसले तरी एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले की, ‘टायगर अभी जिंदा है आणि हो पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कार्याचा गौरव केला.
भाजपचे माजी विधानपरिषदेचे आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांचाही प्रवेश
एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे माजी विधानपरिषदेचे आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. एकनाथराव खडसे यांच्यासोबत नेमकं कोण प्रवेश घेणार याबाबत उत्सुकता होती. या अनुषंगाने आज झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर गुरुमुख जगवाणी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला डॉ.गुरुमुख जगवाणी हे विधान परिषदेवर दोनदा निवडून गेले होते. ते एकनाथराव खडसे यांचे अत्यंत कट्टर समर्थक समजले जातात. डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी आजवर आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. यामुळे ते भाजपमध्ये राहणार की, नाथाभाऊ सोबत जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेत एकनाथराव खडसे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.