मुंबई – हॉलिवूडच्या जगात 007ची छबी कायम ठेवणारे अभिनेते शॉन कॉनरी यांच्या निधनामुळे सर्वस्तरावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कॉनरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटरद्वारे जेम्स बॉण्ड यांच्या 007 मागचे कोडे उलगडले आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमिताभ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘शॉन यांचे निधन झालं ३१ ऑक्टोबर २०२० ला झाले. या अंकांची बेरीज केली असता ३ + १ = ४ त्यात पुढे १ + ० = ५ नंतर २०२० वर्षाच्या संख्येतील पहिला दोन अर्थात ५ + २ = ७ पुन्हा ० म्हणजे ३ + १ + १ + २ = ७ आणि उर्वरित दोन शून्य म्हणजे 007’ अशा आशयाचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. शॉन कॉनरी यांनी साकारलेल्या भूमिकेप्रमाणे त्यांच्या निधनाची तारीख 007 ब्रँड असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
यासोबतच राज ठाकरे यांनी देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘ कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचं महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ ह्यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे. प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखादया देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणं आणि ती अनेक दशकं टिकणं हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावं’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.