हैदराबाद – आंध्र प्रदेशच्या एलुरु शहरातील पिण्याचे पाणी आणि दुध यांसारख्या पदार्थांमध्ये शिसे आणि तत्सम जड तत्त्वे आढळून आल्याने लोकांना रहस्यमय अश्या आजाराने ग्रासल्याचे पुढे आले आहे. आजपर्यंत ५००हून अधिक लोक या विचित्र आजाराने ग्रासित झालेले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) तसेच राज्य आणि केंद्राच्या विशेषज्ञ चमूंनी या विचित्र आजाराची कारणे शोधून काढली आहेत. मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना रिपोर्ट देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री कार्यालया द्वारे जारी केलेल्या बातमीनुसार रहस्यमय आजाराचे कारण निकेल आणि शिसे यांसारख्या जड वस्तूंचे पोटात जाणे हे आहे. यामुळे शनिवारी रात्रीपासूनच लोकांना चक्कर येणे, फिट येणे, जीव घाबरणे, उलटी होणे, आणि पाठदुखी वगैरे त्रास सुरु झाले होते. अधिकाऱ्यांच्या मते आजवर ५०५ लोकांना हा त्रास झाला आहे. त्यापैकी ३७० हून अधिक लोक उपचारा अंती बरे झाले असून १२० इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री (आरोग्य) ए के के श्रीनिवास यांच्या मते लोक बरे होत असल्यामुळे या आजाराला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. श्रीनिवास यांनी सांगितले की आता आजार रहस्यमय राहिलेला नसून प्राथमिक कारणांची माहिती आता झालेली आहे. नुकतीच डब्ल्यू एच. ओ. आणि केंद्रीय आरोग्य संस्थेची चमूही या भागाला भेट देउन गेली आहे. त्यामुळे या चमूने अभ्यास अंती तयार केलेला अहवाल सादर झाल्यानंतर या आजाराबद्दल सविस्तर माहिती कळू शकेल.