कै. भीमराव कोते, नाशिक
…..
परिचय-
भीमराव कोते यांचं मागील वर्षी अकाली निधन झालं. त्यांचं अकाली जाणं संपूर्ण मराठी साहित्यक विश्वाला चटका लावून गेलं. मूळचे गवंडगाव ता येवला येथिल शेतकरी कुटुंबातून अालेल्या या अवलियाचे अवघे भावविश्व ग्रामीण संदर्भांनी व्यापलेले होते जे आपल्याला त्यांच्या प्रत्येक कवितेतून उलगडत राहते. माणसांच्या कविता हा एकमेव विषय घेऊन लिहिणारे ते कदाचित एकमेव कवी असावेत. त्यांच्या कविता अतिशय साध्या सोप्या तसेच सर्वसामान्य माणसांच्या प्रातिनिधिक समस्या व व्यथा मांडणाऱ्या असल्याने त्यांना अल्पावधीत भरपूर लोकप्रियता लाभली.
चालतीबोलती,जितीजागती कविता म्हणजे दादा. मुलांसोबत मित्रासारखं वागणारे दादा,सुनेवर लेकीसारखी माया करणारे दादा, माणसांच्या कवितेत माणूस रेखाटतांना माणसं जोडणारे दादा. कवितेचे भरभरून कौतुक करणारे दादा आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही कवीसाठी आपल्या घराचं दार कायम उघडे ठेवणारे दादा.दादांचा जितका आदर्श घेतला तितका कमी आहे… आयुष्याच्या ज्या ज्या टप्प्यावर या माणसाला जे जे करावं वाटलं ते ते त्यांनी केलं. भरभरून जगले…!
असे होते दादा….
बॉश कंपनीत मेंटेनन्स विभागात ते टेक्नेशियन होते. मायको फोरमचे या सामाजिक संस्थेचे सचिव तसेच
नारायण सूर्वे वाचनालयाचे कार्यकारी संचालक होते. नारायण सुर्वे कविकट्ट्याचा उपक्रम त्यांनीच सुरू केलेला
“माणसांच्या कविता” हा कवितांचा बहारदार कार्यक्रम त्यांनी डिझाईन केला, त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्यांची कविता महाराष्ट्रभर पोचवण्याचे काम दादा शेवटपर्यंत करीत होते… हे करतांनाच त्यांचे आपल्या काव्यलेखनात सतत सातत्य होते. एक कवी, एक सामाजिक भान असलेला कार्यकर्ता आणि एक कुटुंबवत्सल माणूस ही त्यांची ठळक ओळख. कुटुंबप्रमुख म्हणून घरातल्या सगळ्या नात्यांना योग्य न्याय देणे, त्या सर्वांना समाधानी ठेवणे, ही सगळी कामे ते सारखा ताळमेळ साधून करत असत.
सामाजिक कार्यात उडी
किल्लारीच्या भुकंपापासून सामाजिक कार्यात उडी घेतलेल्या या माणसाने सुरूवातीच्या काळात समाजासाठी काम करताना प्रसंगी कुटुंबाची सुद्धा पर्वा न करणारा हा माणूस. पण या संघर्षाच्या काळात वहिनींची त्यांना खंबीर साथ मिळाली जी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. नंतरच्या संस्था आणि सामाजिक कामाचा बरीच वर्षे अनुभव घेतल्यानंतर हळूहळू दादांनी सामाजिक कामाची व कुटुंबाची व्यवस्थित घडी बसवली. प्रत्येक कामात, धोरणात अतिशय स्पष्टता ठेवून दादा काम करत. मोजकं, परखड, व नेमकं बोलणं ही दादाची खासियत. त्यांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी आपल्याला पुर्णत्वास न्यायच्या आहेत. ‘माणसांच्या कविता’ हे त्यांचं संकल्पित पुस्तक लवकरच वाचनालय तसेच स्थानिक साहित्यिक मित्रांच्या सहकार्याने येणार आहे.
भीमराव दादांच्या गाजलेल्या ‘वर्गातल्या मुली कुठे गेल्या’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
– विष्णू थोरे, चांदवड