आनंद लोकरे
मंगळवेढा, जि. सोलापूर
संपर्क-९३०९७१२३७९/ ९४०३४५४५००
…..
आनंद लोकरे यांचा ‘मनातील चांदणं’ हा कवितासंग्रह २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मराठीतील नामवंत तीस पस्तीस कवी मंगळवेढ्यात उपस्थित होते. यावेळी झालेली भव्य काव्यमैफिल अजूनही स्मरणात आहे. आनंद लोकरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात २००६ ते २०१४ दरम्यान मुंबई मध्ये डोंगरी, कुलाबा, दहिसर पोलीस ठाणे तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक पदावर सेवा बजावली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वर्ग १ पदावर गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर २०१४ पासून सांगली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात सेवा बजावली आहे. सध्या ते यवतमाळ जिल्ह्यात आर्णी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी वर्ग १ पदावर कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत काम करणारा हा एक कवीमनाचा अधिकारी सहृदय असा आहे. ते मितभाषी स्वभावाचे असले तरी प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक,कला व साहित्य क्षेत्रात संपूर्ण राज्यभर मित्रांचा खूप मोठा गोतावळा त्यांनी कमावला आहे.
शैक्षणीक कालखंडातच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चा राज्यस्तरीय महाविद्यालयीन साहित्य पुरस्कार ( १९९८) शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या कवितेला मिळाला आणि त्यांची काव्यप्रतिभा अधिक बहरत गेली . ग्रामीण आणि दलित साहित्याचा व्यासंग त्यांच्या जाणीव प्रगल्भ करीत गेला म्हणून कवी नामदेव ढसाळ, यांनीही त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ कवी केशव मेश्राम यांनी त्यांच्या कविता संग्रहाला प्रस्तावना दिली आहे.
कवी आनंद लोकरे यांच्या ‘चिमणे’या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे, चांदवड