नवी दिल्ली : अलीकडे अभिनेता अक्षय कुमारसह अनेकजण लाल टिकली लावून इंस्टाग्रामवर फोटो टाकताना दिसत आहेत. अचानक असे फोटो पडू लागल्याने नेटकऱ्यांमध्ये याचीच चर्चा आहे. असे फोटो टाकण्यामागे कारण आहे अक्षय कुमारचे आवाहन आणि त्याच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन. लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता अक्षय कुमार सध्या व्यस्त आहे. यादरम्यान अक्षयने ‘अब हमारी बारी’ या नावाने एक कॅम्पेन सुरु केली आहे. आणि या अंतर्गतच त्याने लाल टिकली लावून फोटो टाकण्याचे आवाहन लोकांना केले आहे. तृतीयपंथीयांसाठी ही मोहीम सुरु करण्यात आल्याचे त्याने सांगितले.
अक्षयने स्वतःचा असा एक फोटो टाकल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून अनेक फोटो पडत आहेत. बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यानेदेखील या कॅम्पेनमध्ये सहभागी झाला आहे. अक्षय आणि सिद्धार्थ या दोघांनी तृतीयपंथीयांसाठी सुरु केलेल्या या कॅम्पेनचे सर्वानी कौतुक केले आहे. या चित्रपटात अक्षयने तृतीयपंथीयांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे नावही वादात सापडले होते. तेंव्हा सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरु होती. सुरुवातीला चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बम’ असे होते. मात्र यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात, अशी ओरड झाल्याने चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. यात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत आहे. ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.