कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
अमरावती : राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळाची गरज भासल्यास बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंगद्वारे) माध्यमातून उमेदवाराची नेमणूक केली जाते. परंतू, अशी पद्धती अवलंबितांना पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने रिक्त पदांवर कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूक करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडून यांनी आज येथे दिले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रिक्त पदांच्या अनुषंगाने अंशकालीन पदवीधरांच्या नेमणूका यासंदर्भात राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक प्रफुल्ल शेळके यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नोकरी मिळत नसल्याचे चित्र
श्री.कडू म्हणाले की, राज्य शासनाच्या शासकीय तसेच अधिपत्याखालील कार्यालयाच्या आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे एखाद्या संस्था किंवा कंपनीसोबत कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतू, असे करतांना अंशकालीन उमेदवारांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी त्यांना वयाच्या बाबतीत सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूकी दिल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल प्रलंबित प्रश्न निकाली लागेल. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने संकेतस्थळ विकसित केले असून त्यावरुन अंशकालीन उमेदवारांची यादी संबंधित विभागाला प्राप्त करता येईल.
रिक्त पदांचा आढावा
श्री. कडू म्हणाले की, ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयास बाह्ययंत्रणेद्वारे काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्या कार्यालयाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन जिल्ह्यातील पात्र पदवीधर अंशकालीन उमेदवारांची यादी प्राप्त करुन घ्यावी. त्यानंतर विभागाला किंवा कार्यालयाला लागणाऱ्या आवश्यक बाबींचा अटी, शर्ती, सेवेचे उत्तरदायित्त आदी नमूद असलेला करार संबंधित अंशकालीन उमेदवारांसोबत करुन घ्यावा. करार पद्धतीने कंत्राटी स्वरुपात असणारी नियुक्ती संदर्भात सर्व खुलासे उमेदवारांना आधीच करुन द्यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक शासकीय कार्यालयातील रिक्त पदांचा विभागनिहाय आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यात किती आस्थापनेवर अंशकालीन उमेदवार नियुक्ती दिल्या आहेत. आणखी किती अंशकालीन बेरोजगार आहेत याविषयीही त्यांनी माहिती जाणून घेतली. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक श्री शेळके यांनी महास्वयंम पोर्टल विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना करुन दिली.