नाशिक – अंबड पोलिस स्टेशनमधील हवालदार भास्कर दामोदर मल्ले यास पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तशी माहिती अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) दिली आहे. अंबडगावातील भंगार दुकान सुरू ठेवणे आणि त्यावर कुठलीही कारवाई करु नये यासाठी मल्ले याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. अंबडगाव येथील बसस्टॉपच्या ठिकाणी पाच हजार रुपये घेत असताना एसीबीने मल्ले यास रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
दरम्यान, कुणीही लाच मागत असल्यास यासंदर्भात एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.