नाशिक – येथील अंबड परिसरात प्रभाग क्र-२८ मधील हरेश्वर साेसायटी, अर्जुन साेसायटी, वनश्री काॅलनी गार्डन परिसर आदी ठिकाणी असलेल्या माेकळ्या भुखंडावर माेठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे विषारी कीटक व सापांचा मुक्त वावर वाढल्याने आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्यामुळे लहान मुले या मोकळ्या भूखंडावर खेळण्यासाठी जातात. सापांचा मुक्त वावर असल्याने लहान मुलांना त्यामुळे गंभीर स्वरूपाची इजा होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस माेठ्या प्रमाणात झाल्यामुळे रानगवत माेठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे सांपासह इतर विषारी कीटकांचा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी याचा धसका घेतला असून आता सकाळच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक कचरत आहेत. परिसरातील नागरिकांनी वेळाेवेळी मनपाला फवारणी करण्यासाठी कळवले होते परंतु कुठलीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी आराेग्य विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या कामाचे कारण पुढे करत मनपा अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.