नवी दिल्ली – विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला असून परीक्षेच्या तारखा पुढे ढकलता येवू शकतात परंतु परीक्षा रद्द होणार नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. मात्र, परीक्षा घ्याव्याच लागतील, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घेतली आहे. कोरोनासाठीचे कोविड सेंटर तसेच अनेक सुविधा या कॉलेज, होस्टेल व अन्य ठिकाणी साकारण्यात आल्या आहेत. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. तसेच, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालनही होणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा घेणे शक्य नाही, विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची भूमिका महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मांडली आहे. आज यावर युक्तीवाद पार पडला आहे. याप्रकरणी विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. तर, ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्यावात, असे युजीसीने बजावले होते.