नाशिक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. संबंधित प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी मॉक टेस्ट घेण्यात आली. मात्र यात प्रचंड तांत्रिक अडचणी आल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली असून अंतिम परीक्षेवेळी अशा अडचणी आल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय सुरु असतांना पुणे विद्यापीठ सक्षम असल्याचा दावा विद्यपीठाने केला होता मात्र आता संपूर्णपणे तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. मॉक टेस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना लॉग इन करतेवेळी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. तसेच काहीवेळा सर्वर डाऊन असल्याने अनेकांना परीक्षा देता आल्या नाही. त्यामुळे अंतिम परीक्षेच्यावेळी अशा अडचणी उद्भवू नये यासाठी लेखी परीक्षेच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये धाव घेतली आहे.
दरम्यान, परीक्षेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास पुणे विद्यापीठातर्फे हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले संभ्रम आणि नाराजी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.