पुणे – अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे विषयवार व जिल्हावार समन्वयक नेमण्यात आले आहेत. परीक्षा १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहेत. पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हावार समन्वयक नेमले आहेत.
१५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी समन्वयकाही भूमिका मुख्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समन्वयक नेमण्यात आले आहेत. ऑनलाईन परीक्षा देतेवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास समन्वयकाशी तत्काळ संपर्क साधता येणार आहे. विषयनिहाय समन्वयक नेमल्याने परीक्षांच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांना नादात होणार आहे असे मत कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. ‘ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी, ऑफलाईन परीक्षा घेण्यात येतील. युजीसीतर्फे देण्यात आलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास वर्षाच्या शेवटी घेण्यात येईल. ऑनलाईनसाठी विद्यार्थ्यांसाठी दोन सराव चाचण्या घेण्यात येतील, असे मत प्रा. करमळकर यांनी व्यक्त केले. ५० गुणांचे एमसीक्यू प्रश्न असून विद्यार्थ्यांना घरीच परीक्षा देता येणार आहे असेही ते म्हणाले.