पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. त्यासंबंधी आधी मॉकटेस्ट घेतली जाणार आहे. काही परीक्षांदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे सर्व्हरमध्ये अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. त्यामुळे परीक्षेसंबंधी कोणत्याही अडचणीसाठी विद्यापीठाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निराकरण होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यासंबंधित अधिकृत माहिती पुणे विद्यापीठाने वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. मॉकटेस्टच्यावेळी तांत्रिक अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. लॉगीन आयडी आणि पासवर्ड भरतेवेळी ते ग्राह्य धरले जात नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मॉक टेस्ट काल (८ ऑक्टोबर) रोजी पार पडल्या असून यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मॉक टेस्टचा पुढील टप्पा पार पडणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येणार आहेत. सराव परीक्षा तसेच अंतिम परीक्षेदरम्यान अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी ९७१७७९६७९७ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.