नाशिक – जैवविविधतेचे उत्तम उदाहरण म्हणून अंजनेरीकडे पहिले जाते. जानेवारी २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने अंजनेरी टेकडीला संवर्धन राखीव जागा म्हणून घोषित केले. अंजनेरी पर्वतावर आढळणाऱ्या १०५ पक्ष्यांच्या प्रजातींचे, लालमुखी माकड सारख्या दुर्मिळ वन्यजीवांचे संवर्धन व्हावे या हेतूने शासनाने संवर्धन क्षेत्र म्हणून अंजनेरीला घोषित केले होते. वनविभागाने स्थानिकांना हाताशी घेऊन कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, शिकारबंदीची प्रभावी अंबलबजावणी तीन वर्षात केली. मुळेगावापासून अंजनेरी माथ्यापर्यंत प्रस्तावित रस्त्याच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी यासाठी ‘अंजनेरी वाचवा’ हे अभियान राबवले जात आहे. सोशल मीडियावर या यासंबंधी जनजागृती होत असून नेटीझन्सने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अंजनेरीच्या पायथ्याच्या मुळेगावातून थेट माथ्यापर्यंत १४ किलोमीटरचा रस्ता नेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठवला आहे. टेकडीच्या माथ्यावर मानवी वस्ती नाही त्यामुळे स्थानिक जनतेला या रस्त्याचा फायदा होत नाही. या रस्त्याचा उद्देश पर्यटनविकास असा सांगितला जात असला तरी यातून होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे डोंगरावरच्या जैवविविधतेला आणि पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असे निसर्गप्रेमींनी म्हटले आहे.
रस्ता बांधकाम करतेवेळी वनस्पती व प्राणी यांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्फोटकांचा वापर केल्यावर दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याची शक्यता निसर्गप्रेमींनी वर्तवली आहे. रस्ता बांधणीसाठी जंगल मोठ्या प्रमाणावर तोडले जाणार आहे. अंदाजे १२ ते १५ हेक्टरचा परिसर समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ‘अंजनेरी वाचवा’ हे अभियान राबवले जात आहे. http://bit.ly/save_anjaneri_wa येथे नाव, ईमेल सह संबंधित माहिती भरून यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.