हवेत एकाच जागेवर उडू शकणारी कापशी घार
——-
‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’. ही म्हण तशी आपल्या माहीतीतलीच असेल. परंतु, हे झालं आपल्याला आकाशात नेहमी दिसणाऱ्या घारी विषयी. एक घार अशी देखील आहे. जी हवेत उडत असतांना खाली जमिनीकडे बघते, उडता उडता हवेतच क्षणभरासाठी थांबते, त्यानंतर सरळ खाली जमिनीच्या दिशेने झेपावते आणि कडेकपारीत, झाडाझुडपात लपुन बसलेले आपले भक्ष्य चोचीत टोचून क्षणभरात आकाशात पुन्हा झेपावते. या घारीचं नाव आहे “कापशी घार” हिचे इंग्रजी नाव आहे Black Winged Kite. पांढऱ्या रंगाचे पोट, गडद काळपट करड्या रंगाचे पंख, पिवळे पाय आणि घायाळ करणारे लालसर डोळे ही या घारीची ओळख. गवताळ भागात आढळणारा हा पक्षी एकाच जागेवर उडू शकतो व भक्ष्यावर लक्ष ठेवू शकतो. सरडे, छोटे उंदीर आणि पतंग हे या घारीचे आवडते खाद्य.
अशाच या कापशी घारीचा हवेत उडतांना जागेवर थांबून खाली झेपावतांनाचा हा व्हिडीओ टिपला आहे जगदीश देवरे यांनी.