नाशिक – नाशिक विभागात काम करीत असतांना निवडणुका, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व सध्या उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती, या सर्वच मोहिमांमध्ये आपण अगदी संयमाने काम केले; ते यापुढेही करणार आहोत. प्रशासनात काम करीत असताना मला सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो, तसेच सेवानिवृत्ती ही केवळ प्रशासकीय औपचारिकता असून भविष्यातही माझी लोकसेवा सदैव सुरूच राहणार, असे भावोद्गार नाशिक विभागाचे मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी काढले.
विभागीय आयुक्त कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माने बोलत होते. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ.रंजना माने, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जळगांवचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव, अहमदनगरचे जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तर महसूल उपायुक्त दिलीप स्वामी, सामान्य प्रशासन उपायुक्त रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, महसूल प्रबोधिनीच्या संचालिका गीताजंली बाविस्कर, नगर विकास विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, महसूल मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उन्मेष महाजन, प्रभारी उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, महसूल प्रबोधिनीचे उपजिल्हाधिकारी तथा प्रबंधक अरुण आनंदकर, नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे प्रत्यक्ष उपस्थित होते.
महसूल विभागाचे काम गतिमान करण्यात सिंहाचा वाटा: उपायुक्त दिलीप स्वामी
नाशिक विभागाचे काम गेल्या अडीच वर्षापासून अत्यंत संयमाने पाहणारे श्री. माने साहेबांचा नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबारच्या महसुल विभागाचे काम गतिमान करण्यात सिंहाचा वाटा आहे. तसेच पीएम किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी, निवणुकांचे यशस्वी नियोजन तसेच नैसर्गिक आपत्तीतही संयमाने काम करणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा असल्याचे मत , महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
नावाप्रमाणेच ‘राजा’ माणूस : उपायुक्त रघुनाथ गावडे
विभागीय आयुक्त श्री. माने सरांनी कार्यालयीन कामात कर्मचाऱ्यावर टाकलेला विश्वास, वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीने अनेक कामे सहज सोपे होवून तत्काळ निकाली काढली आहेत. तसेच प्रशासकीय कामाबरोबरचं अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी पाठीशी उभे राहत असल्याने माने साहेब खरचं नावाप्रमाणे ‘राजा’ माणूस असल्याचे मत उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. राजाराम माने यांच्या शांत व संयमी स्वभावाचे कौतुक करुन वेळोवेळी आम्हांला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. तसेच कोरोनाची तीव्रता पाचही जिल्ह्यात असतांना देखील अगदी प्रभावीपणे मार्गदर्शन केले. संकटकाळात लीडर म्हणून प्रत्यक्षात फिल्डमध्ये उतरुन काम करण्याचा संदेश आपल्या आचरणातून देणाऱ्या श्री. माने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्वांना शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांचा सहपत्नीक गौरव करण्यात आला त्यांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते.