नाशिक – सिडको परिसर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरला आहे. दाटवस्तीमुळे ख्यात असलेले सिडको आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही चर्चेत आले आहे. गेल्या १५ दिवसात सिडकोमध्ये तब्बल ३ हजार ६६५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्यावतीने शहरातील हॉटस्पॉटवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसात शहरामध्ये एकूण १४ हजार १०० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे सिडकोमधील आहेत. त्याखालोखाल पंचवटी भागात ३ हजार ९६ तर नाशिकरोड परिसरातील २ हजार ५८० कोरोना रुग्णांचा समावेश आहे.
सद्य स्थितीत शहरामध्ये ६ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात सिडकोतील २५०० रुग्णांचा समावेश आहे. पवननगर, जुने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथील सर्वाधिक रुग्णांची नोंद गेल्या पंधरा दिवसात झाली आहे. सिडको परिसर प्रामुख्याने जास्त वर्दळीचा असल्याचे तेथे रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. त्याचप्रमाणे सिडको भागातील बहुतांश नोकरदार वर्ग शहरात कामासाठी जात असल्याने त्याद्वारे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती महापालिकेने व्यक्त केली आहे. यासाठीच सिडको परिसरात अँटीजन टेस्ट वाढवून त्याद्वारे रुग्णांचा शोध घेणे सध्या सुरु आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अँटीजेन चाचणीमुळेच बाधित रुग्ण समोर येत आहेत. तसेच, प्रदुर्भाव रोखण्यातही मदत होत आहे. सिडको परिसरातून सातत्याने ४०० हून अधिक रुग्ण नोंदवले जात असल्याने नाशिकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आता मिशन सिडको राबविण्याची वेळ आली असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे.
गणपतीपासूनच सिडकोत कोरोना वाढलाय,लेखानागर ते पाथर्डी फाटा ते ताजच्या मागील अंबड चौफुली,ते त्रिमूर्ती चौक ते बङदे नगर असा सिडकोचा काल्पनिक चौकोन मानून तेवढ्याच भागात आढळलेल्या रुग्नांची रोजची संख्या स्वतंत्रपणे द्यावी,म्हणजे सिडकोतील रुग्ण संख्या अधिक स्पष्ट होईल