डांगसौंदाणे, ता. सटाणा – राज्यमार्ग १९ चा दर्जा असलेल्या सटाणा-डांगसौंदाणे या २१ किमी अंतराच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बांधकाम विभागाने त्वरीत या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.
सटाणा-डांगसौंदाणे या रस्त्यावर वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तब्बल १०० हून अधिक लहान-मोठी वळणे या रस्त्यावर आहेत. तसेच हा रस्ता निम्याहून अधिक कळवण आदिवासी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो तर उर्वरित रस्ता सटाणा सार्वजानिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे दोन्ही विभागांच्यावतीने दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याच्या साईडपट्टया काटेरी झुडपांनी वेढल्या गेल्याने दोन वाहने समोरासमोर आलीच तर वाहनधारकांची मोठी तारंबळ उड़ताना दिसून येते.
शासन दरबारी चाळीसगाव ते काठरा राज्यमार्ग -१९ म्हणून नोंद असलेला हा रस्ता सटाणा व कळवण तालुक्याला जोड़णारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागातील ३० ते ३५ खेड्यांच्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरुन असल्याने हा प्रमुख रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर झाले असुन काही जणांना आपला जीव गमावला आहे. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.
२१ किलोमीटर लांबिच्या या रस्त्याला तब्बल १०० हुन अधिक लहान मोठी वळणे असल्याने नेहमीच या रस्त्याने वाहन चालविताना वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागते. यातच पावसाळ्यात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे हा रस्ता पूर्णपणे झाकोळला जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. सदर रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधी व वाहनधारकांनी केली आहे. सद्यस्थितीत अपघात झालाच तर संबंधित विभागाला जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात येत आहे.