डांगसौंदाणे, ता. सटाणा – केळझर कालव्याच्या गळतीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर केळझर धरणावर धडक दिली. तसेच, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.
केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने वाहून जाणारे पूर पाणी केळझर कालव्यात टाकून पुढे चारी क्र.८ मध्ये टाकण्याची चाचणी घेण्यासाठी सोडण्यात आले होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा दुरुस्त न करताच पूर पाणी कालव्यात टाकले. त्यामुळे दगडी साकोडे, डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती होऊन शेती व लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी संतप्त झाले.
गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने कालवा दुरुस्त होईपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाला केल्या होत्या. मात्र पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी बंद न केल्याने शेतकरी आक्रमक झाले. दगडी साकोडे येथे कालव्याच्या गळतीचे प्रमाण जास्त असून दुरुस्तीचे टेंडर निघूनही काम संथगतीने सुरू आहे. हे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे केली आहे. तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी कळझर धरणावरच धडक दिली. आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले. या प्रसंगी हेमंत चंद्रात्रे,मनोहर सोनवणे, दशरथ बागुल, अर्जुन भोये,शंकर बहिरम, हिरामण सोनवणे, जनक सोनवणे, यशवंत गांगुर्डे यांच्या सह डांगसौंदाणे, साकोडे, गव्हाणेपाडा गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.