त्र्यंबकेश्वर – पेशवेकाळापासून येथे सुरू असलेली अनोखी परंपरा अखेर कोरोनामुळे खंडित झाली. त्यामुळे त्र्यंबकवासियांसह साऱ्यांचा हिरमोड झाला आणि पोळा सण साजरा झाला असे शहरवासियांना वाटलेच नाही.
पेशवेकालीन परंपरेत असलेल्या देवस्थानच्या मानाच्या बैलांची मिरवणूक करोनाच्या लॉकडाऊनमुळे निघाली नाही. गावोगावी पोळ्याचा सण साजरा करतांना सजवलेल्या बैलांची मिरवणूक मारूती मंदिरात जात असते. त्र्यंबकेश्वर येथे देखील तशीच प्रथा असून यामध्ये देवस्थान संस्थानच्या बैलांचा मान मिरवणुकीच्या अग्रभागी असतो. देवस्थान संस्थानच्या पदरी पुर्वी बैल असायचे व संस्थानिकांचे बैल हे मानाचे समजले जातात. संस्थानच्या जागेवर पब्लिक ट्रस्ट झाले. मात्र, शेकडो वर्षांच्या परंपरा कायम आहेत. संस्थान ट्रस्टकडे बैल नाहीत मात्र दरवर्षी येथील प्रगतशील शेतकरी विष्णुपंत गाजरे हे बैल सजवून आणतात. सजवलेले बैल वाजंत्री लावून सोबत संस्थानिक इतमामाने भालदार चोपदार यांच्यासह मिरवणूक काढली जाते. कुशावर्त ते गावच्या मारूती मंदिरापर्यंत फेरा मारल्या नंतर ट्रस्टच्या महिला शिपाई औक्षण करतात. याकरिता बहुदा चेअरमन न्यायाधिश देखील उपस्थित राहतात. बैलांना नैवद्य दिला जातो. त्यानंतर गावातील शेतकरी आपले बैल घैऊन मारूती मंदिरात दर्शनासाठी जातात.
यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने बैलांची मिरवणूक काढण्यास मनाई केली. त्यामुळे मानाच्या बैलांची मिरवणूक निघाली नाही. त्यामुळे बैलांना पुरणपोळीचा नैवद्य दाखविण्याबाबत महिलांचा हिरमोड झाला. काही शेतक-यांनी बैल सजवून गावातून फेरी मारून आणले. मात्र दोनशे पेक्षा अधिक बैलजाड्या असलेल्या शहरात पोळ्याच्या सणाला असलेली सामसूम व्यथित करणारी ठरली आहे.