बाहुबली थमैय्या
शेती परवडत नाही, अनेक संकटे आहेत, सरकारचे धोरणच फसवे आहे या आणि अशा अनेक तक्रारी होतात. पण, म्हैसूरच्या थमैय्याने शेतीच्या माध्यमातून मोठाच आदर्श निर्माण केला आहे. संकटांची मालिका त्यांनी आपल्या कल्पकता आणि कर्तृत्वाने नष्ट केली आहे. १ एकर शेतात तब्बल ३०० झाडे आणि १० लाखांचे बख्खळ उत्पन्न हे त्यांच्या यशाचे निदर्शक आहे. म्हणूनच दक्षिणेतले खरे बाहुबली म्हणूनही त्यांची ओळख निर्माण होत आहे. त्यांच्या शेतात मारलेला हा फेरफटका….
- भावेश ब्राह्मणकर
(लेखक पर्यावरण आणि सामरिकशास्त्राचे अभ्यासक आहेत)
शेतकरी आत्महत्या हे अत्यंत जटील आणि गंभीर संकट आहे. ते सहजासहजी सुटायचे नाही, असे तज्ज्ञांसह अनेक जण सांगतात. पण, थमैय्या यांनी त्यांच्या कार्यातून अनेकांना मोठा संदेश दिला आहे. हवामान आधारीत शेती ही कशापद्धतीने करता येते याचा वास्तुपाठही त्यांनी घालून दिला आहे. म्हणूनच त्यांच्या या अनोख्या कार्याची माहिती घ्यायलाच हवी.
८०च्या दशकातली ही गोष्ट आहे. नैसर्गिक संकटे, दुष्काळ, पाण्याची टंचाई, शेतपिकांचे नुकसान या आणि अशा अनेक आपत्तींनी ते ग्रासलेले होते. या साऱ्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे तर आपल्यालाच काही तरी करावे लागेल म्हणून थमैय्या यांनी चंग बांधला. अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी आज जे काही केले आहे ते पाहून आपण अचंबित तर होतोच शिवाय असे करता येते याचा वास्तुपाठही मिळतो.
म्हैसूर जवळील हुनसूर तालुक्यात ते राहतात. हा प्रदेश तसा दुष्काळग्रस्तच. पण रडत बसण्यापेक्षा त्यांनी शेतीची अनोखी पद्धत विकसित केली आहे. त्यांच्या यशाचे एकच सूत्र आहे, पंचस्तरीय शेती. हो, एकाचवेळी विविध प्रकारची रोपे, झाडे, पिके लावायची. थमैय्यांचे वय आहे ६९. तरीही तरुणांना लाजवेल असे काम ते करीत आहेत. कोरडवाहू शेती त्यांनी चक्क बागायती मध्ये रुपांतरीत केली आहे. वर्षाकाठी किमान १० लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न घेण्याची किमया त्यांनी करुन दाखविली आहे. त्यातही इतरांपेक्षा त्यांना शेतीसाठी केवळ निम्मेच पाणी लागते.
नारळ, फणस, धान्य, काळी मिरी, सुपारी, आंबा, केळी, भाजीपाला, कडधान्य या आणि अशा कितीतरी झाडे आणि पिकांची त्यांच्या शेतात चलती आहे. वेगवेगळ्या उंचीची झाडे लावून त्यांनी हे साध्य केले आहे. कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे आणि उत्पन्न असे त्यांचे साधे सरळ सूत्र आहे. त्यामुळे जेव्हा पहिले पीक काढून पूर्ण होते तेवढ्यात दुसरेही सज्ज झालेले असते. अशाप्रकारे ते वर्षभर उत्पादन काढून बाजारात विक्रीसाठी जात असतात.
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम दिसले आणि त्यांनी कानाला खडा लावला. केवळ सेंद्रीय स्वरुपाची शेती करुन त्यांनी त्यांचे हे वैभव साकारले आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या सर्व शेतीत ते केवळ सेंद्रीय खतेच वापरतात. पहिली काही वर्षे मला उत्पन्न कमी होते. त्यानंतर आजवर मला मागे बघण्याची वेळ आलेली नाही, असे ते सांगतात. महिन्याला शेकडो शेतकरी येऊन त्यांच्या शेताला भेटी देतात. सर्वांनाच ते हिरीरीने भेटतात आणि माहिती देतात. किंचीतही कंटाळा नाही. तुम्हीही असे करा आणि आनंदी व्हा, असा त्यांचा सल्ला आहे. काहींनी तर तो मनावर घेऊन कामही सुरू केले आहे.
सर्वप्रथम त्यांनी नारळाची झाडे ३० फूट अंतरावर पूर्व आणि पश्चिमेला लावली. दोन नारळाच्या झाडांमध्ये चिकूची झाडे आहेत. नारळ आणि चिकूच्या मध्ये केळीची लागवड केली. नारळाच्या झाडाखाली सुपारीची आणि काळ्या मिरीची रोपे लावली. त्यांच्या मध्येही मसाल्याची रोपे लावली. उत्तर आणि दक्षिण दिशेला त्यांनी आंबा, फणस यांची झाडे लावली. या दोन्ही झाडांलगत शेवगा, निंबू यांची रोपे लावली. उर्वरीत जागेत भाजीपाला, औषधी वनस्पती, हळद आणि अन्य वनस्पती लावल्या आहेत.
त्यांच्या शेतात सध्या १४०हून अधिक औषधी वनस्पती आहेत. हळदीच्या पिकामुळे शेतातील जीवाणू नियंत्रित राहतात. त्यामुळेच भाजीपाल्यासह अन्य पिकांचे मोठे रक्षण होते, असे थमैय्या सांगतात. जेव्हा पीक काढणीला येते तेव्हा ते मूळासकट पीक काढतात. यामुळे मातीला ऑक्सिजन, पाणी आणि हवा मिळते. यातून तिची सुपिकता टिकून राहते, असा त्यांचा सल्ला आहे. झुडुपे, झाडे, वेली अशा विविध प्रकारच्या वनस्पती माझ्या शेतात गुण्यागोविंदांने नांदत आहेत, असे थमैय्या अभिमानाने सांगतात. सर्वसाधारणपणे ज्या शेतकऱ्याला २० हजार लिटर पाणी लागते तिथे थमैय्या यांना केवळ ६ हजार लिटर पाणीच शेतीसाठी लागते. २५ लाख लिटर क्षमतेचे सहा शेततळे त्यांनी शेतात साकारले आहेत. त्यामुळे बारमाही पाणी उपलब्ध होते आणि शेती हिरवीगार राहते. नारळाचे एक झाड ३०० नारळ देते. त्यापाठोपाठ केळी, भाजीपाला आणि अन्य उत्पादने सतत सुरूच राहतात. त्यामुळे बाजारात जवळपास दररोजच काही ना काही विकण्यासाठी थमैय्या जातात.
शेतातच त्यांनी विविध रोपांची छोटेखानी नर्सरी साकारली आहे. अत्यंत कमीत कमी जागेत अधिकाधिक उत्पादन घेण्याची त्यांची ही किमया वाखाणण्याजोगीच आहे. शेतीच्या जोडीला अन्य पूरक उद्योगही त्यांनी सुरू केले आहेत. त्यात गोपालन हा आहे. गोशाळेत गाई, दूध, तूप आदी उत्पादने, सेंद्रीय खते, रोपे अशा नानाविध बाबींची चलती सध्या त्यांच्याकडे आहे. सातत्याने त्यांच्या शेतात भेट देणाऱ्यांची रेलचेल असते. कधी लोकप्रतिनिधी, कधी शेतकऱ्यांचे गट, कधी तज्ज्ञ, कधी प्रशासनातील अधिकारी तर कधी परदेशी व्यक्ती. गेल्या ३० वर्षातील त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे त्यांना नानाविध प्रकारचे यश मिळाले आहे. असे असूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. साध्या शेतकऱ्याप्रमाणेच त्यांचे राहणीमान आहे. प्रसिद्धी, पैसा, समृद्धी असूनही त्यांच्यातला नम्रपणा, कष्ट करण्याची जिद्द तसूभरही कमी झालेली नाही.
अनेक माध्यमांनी त्यांची यशोगाथा मांडली, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले पण त्यांच्यात अहंकाराचे बिजारोपण कधीच झाले नाही. शेतात कुणीही भेटायला आले तर स्वतःच संपूर्ण शेत दाखवतात, माहिती देतात. शिवयोग देशी गोशाळा साकारुन त्यांनी जोडधंद्याला बळकटी दिली आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, यश तुमचेच आहे. श्रद्धा ठेवून काम करा. शॉर्टकट शोधू नका, असा त्यांचा सल्ला आहे. कर्नाटक राज्यातच नाही तर जगभरच थमैय्या ख्यात आहेत. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, नानाविध उत्पादनांची विक्री यांनी त्यांचा व्याप आणखीनच वाढविला आहे. असे असूनही त्यांच्यातला माणूस जागा आहे. जे केले आणि करतो ते सगळ्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे, असे ते अभिमानाने सांगतात. थमैय्यांच्या रुपाने शेतकऱ्यांच्या संकटांना दूर करणारा देवदूतच अवतरल्याची प्रतिक्रीया अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट दिल्यानंतर देतात. चित्रपटातला काल्पनिक बाहूबली पाहण्यापेक्षा हाच खरा बाहुबली पाहून आपण आपले कर्तव्य जाणायला हवे.
(लेखकाशी संपर्क. मो. 9423479348 ई मेल – bhavbrahma@gmail.com)
प्रेरणादायक. शेतकरी वर्गातील अस्वस्थतेवर या आदर्शाचा उतारा आहे.
असे प्रयोग बाकी शेतकरी का करत नसावेत? त्यांना कशाची भीती असावी? ह्याचे उत्तर आपण शोधू शकलो व पुष्कळ शेतकऱ्यांना असा प्रयोग करायचे प्रोत्साहन देऊ शकलो तर खरोखरच खूप शेतकऱ्यांचे भले होइल.