निसर्गत:च प्रत्येकात काहीनाकाही वेगळेपण असतं. जे प्रत्येकाच्या जीवनाला पोषक आणि उपकारकच ठरतं. तसंच माणसाचंही असतं. प्रत्येक माणसात वेगवेगळ्या क्षमता असतात.त्या क्षमतांचा शोध किंवा बोध प्रत्येकालाच होईल असे नाही. फार थोड्या व्यक्तींना स्वत:तलं वल्लीपण वेगळेपण बालपणापासून खुणवत असतं. हळूहळू त्यालाही त्याचा शोध लागत जातो. अशी माणसं स्वत:ला घडवत जातात. लढवत राहतात. म्हणून ती घडतात. स्वत:ला सिद्ध करतात.कलावंत म्हणून नावारूपाला येतात. स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करतात. स्वत:ची वेगळी ओळख बनवतात. कला नेहमी माणसाला आनंद बहाल करते. फक्त तिची साधना कलावंत म्हणून प्रामाणीकपणे केली पाहिजे. कलेमुळे कलाकार जन्मला येतो कोणताही कलावंत साहित्यिक, नाटककार ,कवी, गीतकार, संगीतकार यांच्या कलाकृतीचे दर्शन आपल्याला नेहमी नंतर होते.जसं मुल गर्भात जन्म घेतं तेव्हा पासून आईला त्याची जाणीव होते. जन्मानंतर इतरांना त्याचं दर्शन होतं. अगदी तसंच चित्रकार व इतर कलाकारांचं होत असतं. त्यांच्या कलाकृतींनी आकार,रूप,स्वरूप घेतल्यावर त्या कलाकृतीची ओळख आपणास होते.परंतु गर्भातील मुलासारखाच कलाकृतीचा जन्म कलाकाराच्या काळजात … मनात अगोदर झालेला असतो. कलासक्त मन हे आनंदी जीवनाचं द्योतक असतं. कलावंताची श्रीमंती ही त्याच्या कलेत असते. कला कलावंताला एका उंचीवर नेण्यास नक्कीच मदत करते. त्याच्या व्यक्तिमत्वाला उंची बहाल करते. चारचौघात नाव देते, मानसन्मान देते. अशाच एका कलावंताची ओळख आज आपणास ’ व्यक्ती विशेष ’ सदरातून करून देत आहे.
रंगाची भाषा काळजात जपणारा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील कलावंत म्हणजे सारंग घोलप. नावात सहा रंग असले तरी सप्तरांगाचं ज्ञान बालपणातच मिळालेलं व्यक्तित्व … म्हणजे सारंग घोलप. सदैव हसतमुख असलेला हा कलावंत. एक आवलिया रंगकर्मी. कादवा साखर कारखाना कार्यस्थळावरील बी.के. कावळे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी प्रिय शिक्षक. विशेष म्हणजे वीस वर्षे माझे सहकारी शिक्षकमित्र. त्यांना रंगाचं भान विद्यार्थी दसेपासून लाभलं असावं. आईवडिलांना त्यांचे मुलाचे पाय पाळण्यात नक्कीच दिसले असावे. म्हणून तर त्यांचं नाव सारंग ठेवलं. सारंग घोलप जसजसे मोठे होत गेले. तसे त्यांनी आपल्या नावाकडे गांभीर्याने पाहिलं असावं. आपल्या नावात रंग आहे. याचा त्यांना जेव्हा जाणीव झाली असावी. तेव्हा नावाचा अन्वायर्थ लवण्याचा त्यांच्या बालमनाने नक्कीच प्रयत्न केला असेल. त्याचाच परिपाक म्हणून शालेय जीवनात चित्रकलेकडे मन आकर्षित झालं.पहिल्या दुस-या वर्गातच पोपट चिमणीचे खापरपाटीवर चित्र काढण्यास सुरवात केली. त्यांच्या या गुणाची पारख केली ती उदार गुरुजींनी. पुढे मोहाडीला माध्यमिक विद्यालयात भा.वा.जाधव या हाडाच्या चित्रकार शिक्षकाने सारंग यांच्या आयुष्यात सप्तरंग भरले. शिक्षक असलेले ज्येष्ठ बंधू साहेबराव यांनी पुढे त्यांना चित्रकला महाविद्यालयात शिकण्यासाठी पाठविले. त्यांनी बीडच्या कैलास कला निकेतन मधून ए.टी.डी.केले.कॉलेजचे प्राचार्य एस.एस.शिंदे हे आडगाव(नाशिक)चे राहणारे होते. ते स्वत:च राष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकर्मी होते. गावाकडचा म्हणून त्यांनी जीव लावून घोलपांवर पैलू पाडले. सारंग घोलप यांनी नंतर डीप.ए.एड; ए.एम; आणि जी.डी.आर्ट केले.
चित्रकर्मी सारंग घोलप यांनी कॅनव्हास पेंटिंग (पोट्रेट) प्रकारामध्ये स्वत:च्या नावाला एक वलय निर्माण केलं आहे. महाराष्ट्र,मध्यप्रदेश पाठोपाठ गुजरातमध्ये त्यांची कॅनव्हास पेंटिंग पोहोचली. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, संगीतक्षेत्रातील ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांचे कॅनव्हास पेंटिंग त्यांच्या बैठकीत सन्मानाने विराजमान झालं आहे. सुरगाण्याचे भाचे आणि सातारचे राजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कॅनव्हास पेंटिंग बनविले. ते कॅनव्हास पेंटिंग सातारच्या राजमहालात चित्रकलामहर्षी रवी वर्मा यांच्या चित्रांच्या पंगतीत जावून बसले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय,धर्मवीर संभाजी या मालिकेतील सुप्रसिध्द कलावंत व लोकसभा सदस्य खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ सिनेकलावंत रवी पटवर्धन यांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून त्यांची कौतुकाची थाप मिळविली आहे. आजही रविपटवर्धन अधूनमधून सारंग घोलप यांना दूरध्वनीवरून संवाद साधतात. अशी माणसं रंगाच्या प्रेमानं त्यांनी जोडली आहे. अशा या रंगांच्या साम्राज्यात रंगत गेलेल्या कलावंताने अनेकांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून आनंदरंग उधळला आहे. विधान सभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ ,कादवा कारखान्याचे माजी चेअरमन स्व.रामभाऊ डोखळे, अॅड.बाजीराव कावळे,महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष व कादवाचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे ,दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे आयुर्वेदाचार्य,ड.रवी आचर्य आदींसह हजारो कॅनव्हास पेंटिंग त्यांनी केले आहेत. व्यक्तिचित्र हा खास विषय घेऊन सांरग घोलप यांचे स्वत:सह इतरांच्या आयुष्याला रंग भरविण्याचे हे काम अविरतपणे चालू राहो.सांरग यांच्या सप्तरंगी जीवनाला खूप सा-या शुभेच्छा.
- लक्ष्मण महाडिक,पिंपळगाव बसवंत
अतिशय मोजक्या व निवडक शब्दात एका अवलिया चा परिचय करून दिला कलाकाराला आणि परिचय करून देणा-या लेखकाला ही पुढील कार्यास खूप खूप सदिच्छा!
Very nice painting
Very nice sir
माझा वर्ग मित्र सारंग अतिशय मनमिळावू वप्रेमळ मनाचा एक चांगला चित्रकारच नाही तर त्याही पेक्षा तो एक चांगला माणूस आहे शालेय जीवनानंतर गेल्या माहिन्यात आमची २७वर्षा नंतर प्रथमच भेट झाली तरी तो बिलकुल बदलेला नव्हता असा हा एक मोठा सिद्ध हस्त चित्रकार माझा मित्र असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो
व्यक्तीच्या दिसण्यातील सूक्ष्म बारकावे सुद्धा आपल्या कुंचल्यातून साकारणारे घोलप सर म्हणजे अद्भुत रंगकर्मीच होय,कलेच्या देवतेचे वरदान लाभलेल्या या कलाकाराच्या भावी वाटचालीस सप्तरंगी शुभेच्छा
Nice painting sir
Khup Chhan Kam ahe Gholap siranche
अस्सल चित्रकाराच सुंदर आटोपशीर, नेमकं शब्दचित्र..
You are really very realistic painter having great sense of painting.Live picture and painting is your rare quality .Have the best luck for better future.We are proud of you Sir.