नाशिक – दुःख आणि विघ्नाचे हरण करणाऱ्या तसेच चैतन्याची पेरणी करणाऱ्या गणरायाचे आज (२२ ऑगस्ट) घराघरात आगमन झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठ झळाळून निघाली आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूची भीती आणि सावट कमी होण्यात मोठी मदत झाली आहे. शहर परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नाशिककरांचा उत्साह दिसून आला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले घरातच आहेत. परिणामी, यंदा घराघरातच बाप्पा साकारण्यासही प्राधान्य देण्यात आले. शाडू मातीपासून अनेकांनी बाप्पा साकारले आहेत. सार्वजनिक मंडळांनीही यंदा साधेपणानेच उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
गणेश चतुर्थी सायंकाळी सात वाजेपर्यंत असल्याने दिवसभरात केव्हाही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जात होती. षोडषोपचार पुजेद्वारे घराघरात गणरायाची स्थापना करण्यात आली.