मुंबई – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही कमी न झाल्याने रेल्वेने मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर, लोकल, मेट्रो अशा सर्व सेवा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या आहेत, अशा आशयाचे रेल्वेचे परिपत्रक बनावट असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. तसे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळेच रेल्वेच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र पाच महिने झाले तरी या सर्व प्रवासी नियमित सेवा बंद आहेत. त्या कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. याबाबत रेल्वेचे एक पत्रक व्हायरल झाले. त्यात म्हटले होते की रेल्वे सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बेद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अशा प्रकारचे कुठलेच पत्रक रेल्वेने काढलेले नाही. त्यामुळे त्यावर विश्वास ठेऊ नये, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तशी अधिकृत माहिती मंत्रालयाने ट्विटरवरुन दिली आहे.