नाशिक :- अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केली.
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले खा.शरद पवार यांना वरील मागणीचे निवेदनही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे पेरलेले बियाणे खराब झाले आहेत, रोपे वाहून गेली, अती पावसामुळे बियाणे लागवडी नंतर उगवलेच नाहीत. दुबार पेरण्याही वाया गेल्या तर बियाणांचे भावही गगनाला भिडले असल्याने शेतकरी हतबल झाला असून याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतही खा.शरद पवार यांना साकडे घालण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांनी सांगितले.
कांदा उत्पादक जिल्हा असतांनाही केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना फक्त २५ टन (२५० क्विंटल) तर किरकोळ विक्रेत्यांना २ टन (२० क्विंटल) एवढाच माल साठवण्याचे निर्बंध घातल्याने चौकशी व कारवाईच्या भीतीपोटी गेल्या काही दिवसात व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने कांद्याचे भावही घसरले व खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी बोलून किमान कांदा उत्पादक जिल्ह्यांमधील हि मर्यादा काढून टाकण्यात यावी असे साकडेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांना घातले आहे.
मका पिकाला १८५० रुपये हमीभाव असतांनाही फक्त ९०० ते १००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजना राबवून सरकारने मक्याला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणीही खा. पवार यांच्याकडे यावेळी करण्यात आली.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगिरथ शिंदे, कोंडाजी आव्हाड, नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, जयदत्त होळकर, महेश भामरे, शिवदास डागा, फिरोज मसानी, राजेंद्र डोखळे, राजेंद्र भामरे, विलास रौंदळ, हंसराज गोडबोले, अनिता भामरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :- नुकत्याच झालेल्या पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांना देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आ.दिलीप बनकर, हेमंत टकले, कोंडाजी आव्हाड आदी दिसत आहेत.