मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात आता या दोन नेत्यांची भर पडली आहे.
अभिनेत्री पायल घोष हिने मंत्री आठवले यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वीच रिपाइं मध्ये प्रवेश केला आहे. त्या सोहळ्यात अनेक नेते उपस्थित होते. त्यातच आता आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्या कार्यक्रमास उपस्थित सर्वांनांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या सर्वांना आता कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
तर खासदार तटकरे यांनी ट्वीट केलं की, ‘काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.’