देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन अतिविशेषोपचार व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या राज्यातील कोविडची परिस्थिती पाहता, या विद्यार्थ्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार किंवा जिल्ह्यातील कोविड संख्या लक्षात घेऊन बंधपत्रित सेवेकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे.
सध्या राज्यातील कोविड रुग्ण वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व तेथील रुग्णोपचाराची परिस्थिती विचारात घेऊन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये अतिरिक्त आणि विशषज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ हजार ६४८ विद्यार्थी बसले होते. उन्हाळी २०२० सत्राच्या परीक्षा नुकत्याच झाल्या असून परीक्षेचा निकाल लवकरच अपेक्षित आहे.
विद्यापीठाने या परीक्षांचा निकाल घोषित केल्यावर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर किंवा अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा देण्यात येते.
पदव्युत्तर तसेच अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ हजार ६४८ विद्यार्थी बसले आहेत. तर विभाग निहाय उपलब्ध होणाऱ्या बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या १ हजार २०४ असणार आहे. तर वरिष्ठ निवासी तसेच वैद्यकीय अधिकारी पदावर बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या ४४४ असणार आहे. बंधपत्रित विद्यार्थ्यांना द्यावयाच्या नियुक्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहून या कार्यपद्धतीतून ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट देण्यात यावी असे १४ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांना कळविण्यात आले आहे.
शासकीय/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये येथील मागणी आणि त्यानुषंगाने उपलब्धतेनसुार बंधपत्रित विद्यार्थ्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून ३८५, बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून १७८, महापालिका रुग्णांलयातील विशेषज्ञ अधिकारी म्हणून २८२, तर आरोग्य सेवा अंतर्गत रुग्णालये/ डीसीएच/डीसीएचसी येथे ३५९ असे एकूण १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवारांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय वरिष्ठ निवासी पदासाठी ४४४ विशेषज्ञ यांची सेवा उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नमूद केले.