नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहतांना दिसते आहे. शरणपूर रोड येथील रचना विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने नुकताच एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ‘स्त्री शक्तीचा जागर’ असे या उपक्रमाचे नाव असून यात जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि पंचवटी स्मशानभूमी येथे मृतदेहाची सेवा करणाऱ्या सुनीता पाटील यांची मुलाखत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या प्रयत्नातून कर्तबगार महिलांची यशोगाथा विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. यावेळी जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याशी संवाद साधण्यात आला. परिस्थितीवर मात करत जिद्दीने काम करण्याचे स्वप्न पाहताच यश संपादन होते असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम लहानापासून अंगवळणी पडायला हवे असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे पंचवटी येथील स्मशानभूमीत मृतदेहाची सेवा करणाऱ्या सुनीता पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षिका चैत्राली काळे-पवार यांनी मुलाखत घेतली. मृतदेहाची सेवा करण्याचे काम, त्यामागची पार्श्वभूमी यावेळी त्यांनी सांगितली. घर चालवण्यासाठी कोणतेही काम लहान नसून मृतदेहाची सेवा करायला मिळणे हे नशीब असल्याचे त्या म्हणाल्या. दोन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची यशोगाथा विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली. अशा आडवळणाच्या विषयावर चर्चा, मुलखात आयोजित करणारी रचना विद्यालय शाळा शहरात प्रथमच असून सर्व स्तरावर या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका माया आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
येथे पहा मुलाखत