मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे, त्यावर प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे.
धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहित आहे असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले शिवाय राज्यपाल व त्यांचे नेते असतील लोकांची दिशाभूल कशी करत आहेत हे उघडपणे लोकांसमोर मांडले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
—