नाशिक – कोरोनाच्या संकटकाळात रक्तदान कमी होत असल्याची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली आहे. त्यामुळेच परिषदेच्यावतीने जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून जुना गंगापूर नाका येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. रक्तदानासाठी आलेल्या प्रत्येक रक्तदात्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. संजय पवार या शिक्षकांने शिबीराच्या ठिकाणी आजवरचे ३९वे रक्तदान केले. त्यामुळे त्यांच्यासह अन्य रक्तदात्यांचा जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक परिषदेचे गुलाबराव भामरे, डी यु अहिरे, जे पी पवार, नरेंद्र ठाकरे, दत्ता वाघ-पाटील, गोकुळ चव्हाण, शरद निकम, संजय पवार, राजेश शिंदे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.