नाशिक – मराठा आरक्षणाच्या संदर्भात शहरातील आमदारांच्या घराबाहेर मराठा समाज आंदोलकांनी निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरदारने अध्यादेश आणावा आणि मराठा विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी मराठा समाज क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी त्यासाठी विशेष महाअधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी नाशिक पश्चिम च्या आमदार सिमा हिरे, मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती संदर्भातील आरक्षण जसे आहे तसे ठेवून वटहुकूम काढून मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा त्यासाठी त्वरित आदेश काढून मराठा युवकांना न्याय द्यावा त्यामुळे समाजातील विद्यार्थी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहणार नाही अशी मागणी आपण राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते आणि आपल्या पक्षातील जेष्ठ नेते यांना आशयाचे खुले पत्र कुठलीही शंका न बाळगता द्यावे.मराठा समाज आपल्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे. अन्यथा भविष्यातील आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करता मराठा समाजाची भूमिका काय असेल याचा विचार करावा.तरी याबाबत आपण सकारात्मक रहाल अशी अपेक्षा अन्यथा मतदारसंघात फिरतांना नक्कीच विचार करावा. होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, राजू देसले, आशिष हिरे, शरद तुंगार, शिवाजी मोरे, प्रमोद जाधव, माधवी पाटील, निलेश गायके, योगेश गांगुर्डे, तुषार भोसले, संतोष टिळे, दीपक जाधव, भारत पिंगळे, पुंडलिक बोडके, महेश आहेर, करण शिंदे, सचिन पवार, योगेश कापसे, किरण पानकर, किरण बोरसे, किशोर निकम, वैभव ढिकले, शिवम देशमुख, काजल गुंजाळ, मारुती शिंदे, सम्राट सिंग, गणेश दळवी, उज्वला देशमुख आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.