नाशिक – नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ता समन्वयकांना शहर पोलिसांकडून नाहक त्रास देण्याच्या हेतूने कलम १४९ अन्वये नोटीस बजावली जाणार नाही. तथापी संभाव्य आंदोलनात सार्वजनिक शांतता भंग होऊन सामान्य जनजीवन प्रभावीत होणार नाही याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रातिनिधीक बैठकीत झालेल्या ठरावानंतर शहराची कायदा सुव्यवस्था ढासळेल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी शहर पोलीस सजग झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही समन्वयकांना शहर पोलीसांनी कलम १४९ अन्वये इशारा वजा नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आणि मराठा क्रांती मोर्चा स्वयंसेवक यांची बैठक पोलिस आयुक्तालयात झाली.
मराठा क्रांती मोर्चाचे राजू देसले, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, आशिष अहिरे आदी बैठकीला उपस्थित होते. आंदोलनाच्या परांपरेला धक्का लागणारी कुठलीही भुमिका जबाबदार समन्वयक म्हणून आम्ही घेणार नाही. उलट कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे समन्वयकांनी सांगितले. आयुक्तांनी यावर समाधान व्यक्त केले. आकस किंवा पुर्वग्रहाने पोलिस कारवाई करणार नाहीत, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. बैठकीला उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे हे सुद्धा उपस्थित होते.
——
मराठा समाज समंजस आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. कायदा सुव्यवस्था ढासळेल असे कृत्य स्वतःहून कुठल्याही आंदोलनात होणार नाही.
– राजू देसले
—-
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये जी आंदोलने पुकारली जातील, तीच आंदोलने समाजाच्या वतीने व्हावीत. कोणीही वैयक्तिक आंदोलन करू नयेत, ही नम्र विनंती. समाज एकसंघ आहे आणि तो एक संघच ठेवावा.
– करण गायकर
……….
मराठा समाजाविषयी पुर्वग्रह बाळगून या आंदोलनाच्या भावना भडकावण्यासाठी काही विध्वंसक प्रवृत्ती सोशल मिडीयावर अॕक्टीव्ह आहेत. त्या प्रवृत्तींनाही पोलीस यंत्रणेने समज द्यावी.
– तुषार जगताप
—
छत्रपतींनी आम्हाला वैधानिक संघर्ष शिकवला आहे. त्याच मार्गावर आम्ही लोकशाही पध्दतीने आमचे हक्क पदरात पाडून घेऊच. फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, हिच विनंती आहे.
– गणेश कदम