कथा भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या आणखी एका स्वातंत्र्यलढ्याची…
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
देश स्वतंत्र होऊन साधारणतः वर्षभराचा कालावधी उलटला होता. तरीही स्वातंत्र्याचा प्रकाश संपूर्ण देशात पसरलेला नव्हता, तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने आणि कौशल्याने अनेक संस्थानिकांच्या संस्थानांना आपल्या भारतीय संघराज्यात सामील करून घेतले होते, तरीही त्याला तीन संस्थांने अपवाद ठरली होती. हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर या तीन संस्थानांनी आपले अस्तित्व कायम ठेवले होते.
काश्मीरचा प्रश्न वेगळा होता. निजामाला भारतीय संघराज्यात सहभागी व्हायचे नव्हते, तर स्वतंत्र राहायचे होते. याउलट जुनागढच्या नवाबाला पाकिस्तानात सामील व्हायचे होते. एकीकडे हैदराबादच्या निजामाने वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालू ठेवत वेळकाढू धोरण अवलंबले. तर दुसरीकडे संस्थानांमधील रझाकारसारख्या अतिरेक्यांनी दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. देशभरात स्वातंत्र्याचे वातावरण असताना हैदराबाद संस्थानामधील जनता मात्र भीतीखाली जगत होती. सध्याचा माराठवाडा हा प्रदेश देखील या संस्थानातच होता, येथील जनतेला ही परिस्थिती फार काळ सहन करणे अशक्य झाले होते.
एकीकडे हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष आणि हैदराबाद (मराठवाडा) मुक्ती संग्रामचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र होत होता. वास्तविक पाहता जुलमी राजवटीविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसने पहिला सत्याग्रह 1938 मध्ये केला होता. आणि बरोबर दहा वर्षांनी 1948 मध्ये पोलीस ॲक्शनद्वारे निजाम राजवट संपुष्टात आली. परंतु या दहा वर्षांच्या कालखंडात स्वामीजींच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, अनंतराव भालेराव आदिंसह हजारो कार्यकर्ते या लढ्यात सहभागी होते. देश स्वतंत्र झाल्यावर अन्य राज्यांप्रमाणे हैदराबाद संस्थानातही स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. मात्र हैदराबादची जनता अद्याप स्वतंत्र झाली नव्हती. याच कालखंडात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना निजामाच्या जुलमी शिपायांनी अटक केली होती.
भारत सरकारने निजामाच्या दहशतवादी आणि दडपशाही कार्यवाही विरोधात एक श्वेतपत्रिका जारी केली. पूर्वी झालेल्या कराराप्रमाणे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने हैदराबाद संस्थानात भारतीय सैन्य पाठविण्याचे ठरविले. या कारवाईची व्यूहरचना अत्यंत गुप्त पद्धतीने करण्यात येत होती. असे म्हटले जाते की, गृहमंत्री सरदार पटेल यांनी दि. 12 सप्टेंबर 1948 रोजी रात्री यासंबंधीचा निर्णय घेऊन सैन्याला आदेश दिला, तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू यांना देखील यासंबंधीची खबर नव्हती. परंतु त्यावेळी नेहरू आणि पटेल यांच्या गुप्त बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता, असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात.
दि. 13 सप्टेंबरला पहाटे हैदराबाद संस्थानामध्ये तिन्ही बाजूंनी पोलिसांच्या वेशात सैनिक घुसले. या कारवाईला पोलीस ऍक्शन असे संबोधण्यात आले. सैन्याचे प्रत्यक्ष नियंत्रण मेजर जनरल जयंतनाथ चौधरी यांना केले. तर सैन्याला मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण विभागाचे सैन्यप्रमुख लेफ्टनंट जनरल महाराज राजेंद्र सिंह यांनी केले. हैदराबाद संस्थानांत भारतीय सैन्य दाखल होताच निजामाच्या सैनिकांची मोठी गडबड उडाली, कारण या सैनिकांची काहीच तयारी नव्हती, किंबहुना त्यांची लढाई करण्याची तयारी नव्हती.
वास्तविक पाहता निजाम राजवटीत राज्याच्या उत्पन्नाचा फार मोठा भाग लष्कर आणि पोलीस यावर खर्च केला जात असे, रझाकार या जुलमी संघटनेला देखील पैसा पुरविला जात असे, इतकेच नव्हे तर परदेशातून देखील चोरूनमारून शस्त्रास्त्र आयात करण्यासाठी लाखो रुपये खर्च होत असत. मात्र इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्यावर चालून येईल याची निजामाला आणि त्याच्या सैन्याला देखील खात्री नव्हती. कारण याच दरम्यान निजामाचा पंतप्रधान लियाकत अली हा गुप्तपणे पाकिस्तानात जाऊन महंमद अली जिना यांना भेटला होता. इकडे भारत सरकारने अत्यंत मुत्सद्देगिरीने पोलीस ऍक्शन योजनेनुसार निजामाला कोंडीत पकडले. या कारवाईला दि. 13 रोजी पहाटे सुरुवात झाली आणि दि. 17 सप्टेंबर पर्यंत सुमारे चार दिवस ही कारवाई सुरू होती.
हैदराबादचे सैनिक आणि रझाकारचे दहशतवादी मिळून सुमारे बाराशे लोक या कारवाईत ठार झाले. तर भारतीय लष्कराचे दहा जवान शहीद झाले दि. 17 रोजी पहाटे भारतीय सैन्य हैदराबादच्या वेशीवर धडकताच निजामाने शरणागती पत्करली. निजामाने रेडीओ दख्खनच्या हैदराबाद केंद्रावर येऊन भाषणात आपण भारतात सामिल होत असल्याची कबूली दिली. स्वामी रामानंद तीर्थ यांची हैदराबादच्या तुरूंगातून सुटका करण्यात आली. या रझाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी याच्या सर्व वल्गना हवेतच विरल्या.
निजामाचा पंतप्रधान लियाकत अली हा राजीनामा देऊन परागंदा झाला. त्याकाळी हैदराबाद राज्यात असलेल्या (नंतर दि. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रात सामील झालेल्या) मराठवाड्यात घराघरावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज डौलाने फडकत होता. तो दिवस होता, १७ सप्टेंबरचा. तेव्हा पासून हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात येते.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)
उपयुक्त लेख…अभिनंदन
धन्यवाद सर
खूप छान सर