नाशिक – मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संलग्न व्यावायिकांच्या वतीने आज राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. नाशकातही जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने आज सोमवारी (दि. २) गोल्फ क्लब मैदानानजिक धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. नाशिकमधील धरणे आंदोलनास मोठा प्रतिसाद लाभला.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मंडप डेकोरेटर्स आणि संबंधित व्यवसाय आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहेत. याचा जिल्ह्यातील हजारो कुंबियांना फटका बसला आहे. ही आर्थिक विपन्नता दूर करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व व्यवसाय तत्काळ लॉकडाऊनमुक्त करण्यात यावेत, तसेच विवाह व तत्सम समारंभात नियमांना अधीन राहून ५०० हून अधिक व्यक्तींना सहभागासाठी परवानगी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी आज येथे करण्यात आली.
दरम्यान, धरणे आंदोलनानंतर आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात येऊन मंडप डेकोरेटर्स व संलग्न व्यावसायिकांना येणार्या अडचणी कानी घालण्यात आल्यात. त्यावर आपल्या अडचणी शासनापर्यंत पोहचवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
आपल्या मागण्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी असोसिएशनने हे पाऊल उचलले. त्यानुसार आज सकाळी ९ वाजेपासून गोल्फ क्लब मैदानानजिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह या संघटनेशी संलग्न असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट, एलईडी वॉल, डीजे साऊंड, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स, छायाचित्रकार, केटरर्स, घोडाबग्गी, ऑर्केस्ट्रा, बॅण्डवादक, स्वागत ग्रुप, वेटर, फेटेवाले, जनरेटर आदी व्यावसायिक संघटनांनी सहभाग नोंदवला.. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक संघटनांचे सदस्य व्यवसायाअभावी आर्थिक विपन्नावस्थेत गेले असून त्यांना केवळ बिगीन अगेन मोहिमेअंतर्गत पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याचे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष केशव डिंगोरे यांनी सांगितले. सदर आंदोलनात मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संलग्न व्यावसायिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यामध्ये असोसिएशनचे सल्लागार विनोद दर्यानी, उपाध्यक्ष दाऊद काद्री, सचिव सुनील महाले, खजिनदार जितेंद्र शर्मा, शिवा देवरे, उमेश गायकवाड, अमर वझरे, संजय शिंदे, पुनाराम महाराज, सुभाष नाईकवाडे, पंकज वाणी, अनिल अमृतकर यांसह विभागीय पदाधिकारी सहभागी झाले.
पांढरा शर्ट, काळ्या छत्रीने वेधले लक्ष
आजच्या धरणे आंदोलनप्रसंगी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. सहभागी झालेल्या असंख्य आंदोलकांनी पांढरा शर्ट परिधान केला होता. तसेच सोबत काळ्या रंगाची छत्री आणली होती. या दोन्ही बाबी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
शासनाने साकल्याने विचार करून न्याय द्यावा
गेल्या काही महिन्यांपासून मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न व्यवसायांशी निगडीत जिल्ह्यातील हजारो हात रिकामे झाले आहेत. काम नसल्याने अर्थचक्र पूर्णपणे मंदावले असून त्याचा हजारो कटुंबियांवर परिणाम झाला आहे. अन्लॉक प्रक्रियेदरम्यान अनेक व्यवसाय सुरू करायला शासनाने हिरवा कंदील दाखवलेला असताना आमच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. आजच्या राज्यस्तरीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. शासनाने त्याची दखल घेत आणि साकल्याने विचार करून आम्हा व्यावसयिकांना त्वरित न्याय द्यावा. तसेच विवाह आणि तत्सम समारंभात ५०० पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी देण्यात यावी.
– केशव डिंगोरे, अध्यक्ष, नशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन.
व्यवसायारंभास परवानगी मिळणे अत्यावश्यक
कोरोनाचे संकट सार्वत्रिक असले तरी त्याअनुषंगाने लावण्यात आलेल्या कलम १४४ चा नाशकात बाऊ करण्यात येत आहे. इतर सर्व व्यवसाय सुरळीत सुरू असताना आम्हा व्यावसायिकांना मात्र लॉकडाऊनच्या जोखडात अडकवून ठेवण्यात आले आहे. अवघे अर्थकारणच थांबल्याने पोट कसे भरायचे, ही मोठी समस्या हजारो व्यावसायिकांना भेडसावत आहे. बरं, लॉकडाऊनचा परिणाम पुढील अनेक दिवस राहणार असल्याने आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला व्यवसायारंभ करण्याची परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा उद्या शेतकर्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल.
– संजय जगताप, अध्यक्ष, नाशिक छायाचित्रकार संघटना